आडे गावातून
केळशीकडे जाताना उजव्या हाताला दगडी पाय-या बांधलेल्या दिसतात.
10/15 मिनिटांची ही पाय-यांची चढण चढून गेल्यावर आपण पाच मंदिराच्या
समूहापाशी पोहोचतो. ही सर्व मंदिरे त्यांच्या बांधकामाच्या धाटणीवरून
पेशवेकालीन वाटतात. स्थानिक लोकांच्या मतानुसार ही स्थाने पुरातन
आहेत. येथे मुख्य मंदिर परशुरामाचे असून त्याच्या उजवीकडे शंकर-रेणूका,
डावीकडे मारूती, गणपती आणि वेताळ व शनि अशी मंदिरे आहेत. सर्व
मंदिरे पूर्वाभिमूख असून अशा पध्दतीचा मंदिर समूह या भागात पाहायला
मिळत नाही. मंदिराच्या डावीकडे दगडी पाय-यांचे पाण्याचे मोठे
कुंड आहे. मध्यभागी एक छोटी, खोल पाण्याची विहीर आहे. कोकण किना-यावर
दोन ठिकाणीच परशुरामाची मंदिरे आढळतात. त्यातील एक चिपळूण येथे
असून दुसरे आडे-पाडले येथे आहे.
आडे गावातून नारळी पोफळीच्या बागांमधून समुद्रकिना-यावर जाता येते. गावाला देखणा
समुद्रकिनारा लाभला असून, किना-यालगत केवडयाचे मोठे बन आहे. हंगामाच्या दिवसांत
म्हणजे गणपतीच्या सुमारास संपूर्ण किना-यावर केवडयाचा सुगंध पसरलेला असतो.
|